आजपासून होणार महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज वाटप

Foto

छत्रपती संभाजीनगर,  (सांजवार्ता ब्युराो) : महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी बुधवारी (दि.४) उमेदवारी अर्जाचे वितरण महानगरपालिकेच्या सचिव विभागातून करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ६) दुपारी तीनपर्यंत अर्जवाटप आणि त्याच दिवशी सायंकाळी सहापर्यंत अर्ज भरण्याची अंतिम वेळ राहणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी अर्जाचे वितरण सुरू झाले तरी भाजपने अद्याप महापौर कोण असेल याचे पत्ते ओपन केलेले नाहीत. त्यामुळे अद्याप शहरवासीयांना उत्सुकता आहे.

महापालिकेची १५ जानेवारीला निवडणूक झाली तर १६ ला मतमोजणी झाली. दरम्यान, राज्य शासनाने महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढली, त्यात सर्वसाधारणसाठी महापौराचे आरक्षण सुटले आहे. त्यानुसार महापौरपदी कोण बसणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापौर त्यानंतर उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या विशेष सभेला सुरवात होईल. अर्जाची पीठासन अधिकारी छाननी करतील. अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल.

हात उंचावून करणार मतदान...
महापौर, उपमहापौर पदांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमाणे घोषित करण्यात येतील. ज्या उमेदवारांचे नाव पुकारण्यात येईल त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ उपस्थित नगरसेवकांना मतदान करता येईल.